Testimonial

सुधीर व्यंकटराव मुळे

बीजेएसचे संस्कार आणि उर्जेमुळे घडलो

१९९३ला मी सातवीमध्ये होतो. वय साधारणत: १३ वर्षे. त्या वर्षी जमिनीमध्ये काहीतरी झाले आणि क्षणात आपलं घर आणि माझी माणसे क्षणात पोरकी आणि परकी झाली. त्या घटनेला भूकंप असे म्हणयायचे हे इतरांच्या बोलण्यावरुनच कळाले. कारण त्यापूर्वी “भूकंप” हा शब्द कधी कानावर आला नव्हता. त्या भूकंपाने सगळे खचले होते हे मात्र नक्की. कारण पडलेली घर बांधता येणं शक्य होतं. हक्काची देवाघरी गेलेली माणसं काही ठराविक काळानंतर विसरणं ही थोडं कठीण का असेना पण शक्य होतं. पण ज्यांच्या सोबतीने आणि ज्या विश्वासाने आम्हा लहानग्यांनी आमच्या भविष्याचे व करिअरचे बंगले जे मनात सजवले होते ते हवेत विरु देण्यासाठी मन सज्ज नव्हतं.

एवढया मोठया नैसर्गिक आपत्तीला मोठया प्रमाणात मदत खात्रीशीर मिळत होती. कोणी राहण्यास घर दिलं, कोणी पांघरायला, कोणी अंथरुण, कोणी भांडी. काही नामवंत व्यक्ती आणि संस्थाकडून दोन वेळच्या खाण्याची, सगळं काही जाग्यावर मिळत होतं, अगदी हवं तसं राजेशाही थाटात.

पण हा थाट इतरांच्या मदतीने आणि सहानभूतीने होता. हे सुख, हा थाट, काही काळानंतर आणि वेळेनंतर हळू हळू कमी होणार होता हे कळत होते. कारण या उपकारी माणसांची अमूल्य मदत फ़क्त वेळेतून सावरण्यासाठी होती भविष्य घडवणारी नव्हे. शारीरिक आणि भौतिक सुख देणारी सगळी साधनं आमच्यासमोर त्यावेळी होती पण शिक्षणाबद्दल आम्ही बालक आणि आमचे पालक शांतच होते. हीच शांतता, हीच शांती मनाला आणि काळजाला पोखरत होती.

अगदी याच शांततेच्या काळात एक दिवस आम्ही एका सावकाराच्या घरी एका शनिवारी टीव्हीवर “जय हनुमान” हा कार्यक्रम पहात होतो. तोच त्या घराबाहेरचा एक घोळका सारखा लक्ष वेधत होता. थोडसं त्या घोळक्याकडे जाऊन पाहिले तर तिथं काही तरी चर्चा चालल्याचे लक्षात आलं.

ती चर्चा काही शाळकरी मुलं, शेतकरी पालक आणि नावाजलेल्या पुढा-यात चालली होती. थोडसं कान देऊन चर्चा समजत गेलो तर त्यातून असं उमगलं की, एक संस्था जी भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यास आली होती. पण मदतीचा प्रकार थोडासा वेगळा होता तो म्हणजे असा, की हे शिक्षण आमच्या जन्मभूमीमध्ये मिळणार नसून शिक्षणाचे माहेरघर पुणे येथे मिळणार होते.

साहजिकच त्यासाठी मुलांचे स्थलांतर हाच त्याला एकमेव पर्याय होता. हे पुनर्वसन ती संस्था सगळे काही स्वखर्चाने करणार होती. पण तरीसुद्धा पोटचा गोळा एका अनोळखी व्यक्ती अथवा संस्थेकडे देणं कोण्या पालकाला धाडसाचं वाटत नव्हतं.”

संस्थेने दोन दिवसात हा निर्णय घेण्यास सांगितले होते. कारण दोन दिवसांनी संस्थेच्या गाडया आम्हा मुलांना गावात घेण्यास येणार होत्या. निर्णय घेणं त्या काळी आमच्या पालकांना शक्य होत नव्हतं. आम्हाला कोणी विचारत नव्हतं कारण निर्णय घेण्याची क्षमता आमच्यात नाही असे पालकांना वाटायचे.

पण खरं सांगायचे तर शिक्षणासाठी पुण्याला जायचे हा उत्साह तर माझ्यात नव्हता. उत्साह होता तो कल्पनेतला शहर पाहण्याचा. कारण शहराविषयी बरच ऎकून होतो. शहर म्हणजे जणु स्वर्गच. शहरातल्या उंच-उंच इमारती, चकाचक कपड्यातील फ़ाड फ़ाड इंग्रजी बोलणरी वेगळी देखणी माणसे, मोठे रस्ते, त्यावर धावणा-या रंगबेरंगी गाडया. हे सगळं पाहण्यासाठी आणि अनुभण्यासाठी पुण्यासारखं शहर आम्हाला खुणावत होतं. मनातून खूप वाटायचं आपण जायलाच हवं. पण कमी शिकलेल्या आई-वडिलांना हा निर्णय देण भीतीचं वाटत होतं.

पण देवासारखा माझा मामा आमच्या घरी आला आणि मोठया समजुतदारपणे निर्णय झाला की, “आता या काटर्यांना त्या संस्थेच्या हवाली करायचं. गावात डोळयासमोर उनाड फ़िरण्यापेक्षा नजरेआड जे होईल ते होईल या भावनेने आम्हाला त्या संस्थेच्या ताब्यात देण्यात आलं.” कसं का असेना पण मामाच्या विचारी आणि कल्पकतेमुळे आम्हाला पुणं पाहायला मिळणार होतं. अखेर शिक्षणाच्या विचारानं जी शांती सर्वत्र झाली होती ती त्या जैन संस्थेच्या शांतिलाल मुथ्था या देवमाणसाने दूर केली.

अखेर तो दिवस उजडला. गावात जैन संस्थेची गाडी आली. आम्ही त्यात बसलो. दोन दिवसाचा प्रवास करत आम्ही पुण्यात “आत्मनगर”मधील एका सदनिकामध्ये पोहचलो. काही कालवधी नंतर आम्ही २००० भूकंपग्रस्त मुले संत तुकाराम नगर येथे आमच्या शैक्षणिक पुर्नवसनासाठी कायस्वरुपी स्थायीक झालो. ७वी ते १०वी हा साडेतीन वर्षाचा कालखंड याच परिसरात गेला.

तेथे सुरुवातीचा काळ फ़ार गमतीशीर आणि आपुलकीचा वाटला. आम्हाला रोज भेटण्यासाठी तेथील स्थानिक मंडळी, देश-विदेशातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यायचे. लोकांनी संस्थेला भेट देणे गैर नव्हते. मात्र रोज पाहुण्यांना आम्ही नवीन असलो तरी पाहुण्यांना आम्ही कंटाळलो होतो. कारण पाहुणे आले की तीच शाळेच्या पटांगणात बैठक व्यवस्था, तीच ठरलेली भाषणे आणि संस्थेला मिळणारी देणगी अथवा काहीतरी भेट. एवढे मोठे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला भेटी मिळणं - देणगी मिळणं हे खरे तर अपेक्षेप्रमाणेच होते. आणि त्याची गरजही होती. कारण २००० मुलांचं शैक्षणिक पुनर्वसन आणि भवितव्य घडवायला “पैशाची राखीव उर्जा” असायलाच हवी होती. हे फ़क्त संस्थेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनाच माहिती होते. आणि मदतीचा ऒघ ही काही महिने व वर्षेच होता. पण संस्थेने आमचे ग्रॅज्युएशन पर्यंत बाळंतपण करण्याचे ठरवले होते.

कोणतेही पाहुणे अथवा सामाजिक कार्यकर्ते संस्थेला भेटायला आले की आम्ही फ़क्त आमच्या खाणावळी समोर असलेल्या सूचना फ़लकावर पाहायचो. सूचना फ़लकावर पाहुण्याचे नाव आणि गोड पदार्थाचा मेनु दिसला की चेह-यावर आपोआप हास्य उमलायचे अगदी कमळाच्या फ़ुलासारखे.

याचा अर्थ असा नाही की संस्थेने आम्हाला कधी चांगलं खायला दिलं नाही. खर तर ती संस्था म्हणजे आमचं एक हक्काच घर होतं. सगळी माणसे अगदी विश्वासाने आणि जबाबदारीने आमची काळजी घेत होती.

पहाटे ५ ते ५.३०च्या दरम्यान ऊठणं, शाळेच्या मैदानात अर्धवट झोपेतच ५.३० ते ६.३० व्यायाम करणं, ६.३० ते ७ या दरम्यान फ़क्त १२ नळावर आणि १५ संडासमध्ये आणि १५०० विद्यार्थी सर्व विधी उरकायचो. ७ ते ७.३० मध्ये तेवढयाच मुलांचा अल्पोहार व चहापान, ७.३० ते १२.३० शाळा, १ ते २ जेवण, २ ते ४ आराम, साफ़सफ़ाई. ४ ते ६ संस्थेपासून दूर असणा-या मैदानावर मैदानी खेळ, ६ ते ७ पुन्हा स्वत:साठी वेळ, ७ ते ८ जेवण, ८ ते १० सक्तीचा अभ्यास आणि रात्रशाळा आणि १० ते ५ झोप.

संस्थेने हे ठरवलेले आमचं वेळापत्रक त्याकाळी आम्हाला फ़ार त्रासदायक वाटायचं. हा जुलमी कायदा नको वाटायचा. कधी एकाकी अपील केले तर त्याला फ़ारसा प्रतिसाद संस्थेकडून मिळाला नाही. मग ही संस्थेची नियमावली मोडून काढण्यासाठी ग्रुप करुन उपोषण तर कधी संप करायचो. असं वाटायचं की आता संस्थेला नमतं घ्यावं लागेल आणि आम्हाला आमचं वेळापत्रक बनविण्यासाठी परवानगी मिळेल. वरील वेळापत्रकाप्रमाणे संस्थेतील इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पण काम करावे लागायचे त्यामुळे हे वेळापत्रक नको असलेले शिक्षक आणि काही कर्मचारी आम्हाला या उपोषणासाठी व संपासाठी छुपा पाठिंबा दयायचे.

पण संस्थेतील काही संतविचारी व्यक्तींमुळे संस्थेचे नियम फ़ारसे बदलले नाहीत की मुलांच्या अनावश्यक व गैर मागण्यांना कधी न्यायता मिळाला नाही. त्या व्यक्तीनी गैरवर्तणूक करणा-या विद्यार्थ्यांना कधीही पाठीशी घातलं नाही. त्या व्यक्तीची आम्हा विद्यार्थ्यांना आदरयुक्त भीती होती. वरील वेळापत्रक हे जुलमी अत्याचार नसून चांगल्या शरीरसंपत्तीसाठी व तेजस्वी बुद्धीसाठी आणि भविष्य घडविण्यासाठी किती महत्वाचे आहे हे या व्यक्तींनी आमच्या मनावर चांगलेच बिंबवले.

त्या संस्थेत आमचे सगळे काही चांगले आणि आलबेल चालले होते. मनासारख नसलं तरी “मस्त चाललं होतं आमचं”. पण एक काळजी सतावत होती ती म्हणजे भविष्याची.... करिअरची. घरची परिस्थिती काही विशेष नव्हती त्यामुळे मी कोठेतरी पटकन कामाला लागावं आणि घरी पैसा-आडका देऊन हातभार लावावा ही घरच्यांची अपेक्षा.

कॉलेज करता करता काही ठिकाणी नोकरीची विचारणाही केली मात्र शारीरिक क्षमता आणि वयाची कमतरता यामुळे कोणी संधी दिली नाही. तर काही ठिकाणी काम करताना हेळ्सांड व्हायची. एका कुरिअर कंपनीमध्ये काही महिने कामही केले कॉलेज बुडवून, पण अपेक्षेप्रमाणे मोबदला आणि हक्क नाही मिळाला.

मग ठरलं की काहीतरी वेगळं करायचं पण नोकरी नाही. व्यवसाय करायचा पण हिमंत नव्हती होत. तीच हिंमत मनात आणायची होती त्यासाठी अनेक व्यवसायकांची पुस्तके आणि लेख वाचण्यास सुरुवात केली. त्यातून मनाला ताकद मिळत गेली. आणि व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घरच्यांच्या कानावर भीत भीत घातला. मात्र त्यांनीच मला या निर्णयामुळॆ “वाळीत” टाकलं.

मग आता व्यवसाय करायचा तरी कसा? व्यवसायासाठी ३ गोष्टी फ़ार आवश्यक होत्या एक भांडवल, दुसरे जागा आणि तिसरे मनुष्यबळ. मित्राशी पार्टनरशीप करुन त्यांकडून भांडवल उभ केलं. जागेसाठी फ़िरत होतो, चौकशी करत होतो शेवटी शिक्रापूर या ठिकाणी जागा मिळाली. राहिले ते मनुष्यबळ त्यासाठी पूर्णवेळ स्वत:च काम करण्याची तयारी केली.

व्यवसाय सुरु झाला तो एका संगणक प्रशिक्षण केंद्राचा. व्यवसाय सुरु केला तेव्हा एक संगणक भाडयाने घेतला होता. ते संगणक मॉडेल होते ३८६ आणि ते सुद्धा Black & White. व्यवसायाला सुरुवात तर झाली मात्र विद्यार्थ्यांचा काही प्रतिसाद मिळत नव्हता. महिन्यामागून महिने ओलांडत पुढे चाललो होतो पण २ अंकी विद्यार्थी संख्या सुद्धा मिळत नव्हती. “पार्टनर”ला रिस्क नको होती त्यांनी त्यांचे अंग त्यातून काढायला सुरुवात केली आणि दोघा पार्टनरनी एकाच वेळी त्यातून स्वत:ला मुक्त केले व पैशारुपी गुंतवलेले भांडवल घेऊन निघून गेले.

व्यवसाय पोरका झाला. आता व्यवसायात शिल्लक होते ते एक भाडयाचा संगणक आणि ३०० रुपयाचे खेळते भांडवल. दुसरे काही खुर्च्या, टेबल आणि भाडॆतत्वावर मिळवलेली जागा. व्यवसाय चालवाण्याची इच्छा तर खूप होती; मात्र आता महिन्याला लागणारा आर्थिक डोस कोणाकडून घ्यायचा हा मात्र प्रश्न होता. काही महिन्यांचे भाडेही देणे बाकी होते तर वाघोली वस्तीगृहातून ये-जा करण्यासाठी काही रक्कमेची आवश्यता होती.

येण्या-जाण्याचा खर्च वाढू नये म्हणून व्यवसायाच्या ठिकाणीच राहण्याची हिंमत करावी लागली. व्यवसायात पैसा आणण्यासाठी आता फ़क्त संगणक प्रशिक्षण केंद्रावर अवलंबून राहणं शक्य नव्हतं म्हणून मोबाईल रिपेअरिंग, संगणक दुरुस्ती आणि एलआयसी एजंट याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि आता माझा व्यवसाय एका कॉकटेल पेयाप्रमाणे परिपूर्ण झाला आहे असे वाटायला लागले. पण आता व्यवसायात पैशासोबत वाद-विवाद ही यायला लागले. कारण व्यवसाय “कॉम्बो” होता.

हा “कॉम्बो” व्यवसाय करता करता काही विद्यार्थ्याकरवी एक वेगळा शब्द कानावर पडायला लागला. तो म्हणजे मला-आम्हाला “MS-CIT” कोर्स करावयाचा आहे. विद्यार्थ्यांची मागणी होती पण तो माझ्याकडे उपलब्ध नव्हता म्हणून मी त्यांना इतर कोर्सेसचा “महिमा” समजून सांगत होतो. काही विद्यार्थ्यांना दुस-या कोर्समध्ये रस निर्माण करण्यात यशस्वी व्हायचो तर काही जण “MS-CIT” वर अडुन रहायचे.

“MS-CIT” य़ा कोर्सची मागणी जशी वाढत गेली तशी हा कोर्स सुरु करण्याची माझीही लालसा वाढत गेली. पण हा कोर्स मिळतो कोठे, त्याचे नक्की स्वरुप काय, का करतात याचा मागोवा घेण्यासाठी मी “मार्केट”मध्ये चौकशी करायला सुरुवात केली. चौकशीअंती त्या कोर्सची मान्यता मी “एमकेसीएल”च्या मदतीने मिळविली. एमकेसीएलच्या सहकार्याने आणि बीजेएसमधील नियोजनाच्या अनुभवामुळे आज मी चांगले यश मिळवु शकलो. आज शिक्रापूरमध्ये पुणे-नगर हायवेवर स्वत:च्या ३६०० स्के.फ़ुट जागेमध्ये ५२ लॅपटॉपची सुसज्य लॅब पूर्णत: सोलरवर उभी केली आहे. ग्रामीण भागात MS-CIT कोर्ससाठी सर्वाधिक प्रवेश करणारी माझी “ASN” ही संस्था असून त्याबाबत एमकेसीएलने गौरवही केला आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियाना मार्फ़त सर्वोकृष्ट काम करण्यारे देशातील सर्वोकृष्ट केंद्र म्हणून माझा केंदीय मंत्री श्री. रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

संगणकीय प्रशिक्षणासोबतच मी महा ई-सेवा केंद्र ही चालवत आहे. ज्या मार्फ़त मी येथील नागरिकांना सर्व शासकीय दाखले, पासपोर्ट, आधार, बॅकिंग इ. अनेक सेवा तत्पर देत आहे. शिवाय महाराष्ट्रातील पहिले “RTO सेवा केंद्र” माझ्याकडे म्हणजे शिक्रापुरला मिळविण्यात मला यश आले आहे.

मला एवढे मात्र नक्की सांगता येईल की, एका वेगाने वाढणा-या आणि झपाटयाने बदलणा-या जगासोबत काम करताना अजूनही कामाचा उत्साह कमी होत नाही. एका “भाडयाने” घेतलेल्या कॉम्प्युटरवरुन सुरुवात केलेल्या माझ्या व्यवसायात आज स्वत:ची ३६०० स्के. फ़ुटाची जागा, ५२ लॅपटॉपची लॅब आणि १६ लोकांचे मनुष्यबळ माझ्याकडे आहे ते फ़क्त बीजेएसने दिलेल्या संस्कार आणि उर्जेमुळेच.

नावीन्य रुपाने केलेल्या माझ्या संगणक प्रशिक्षण केंद्राला स्थानिक अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक व नेत्यांनी तर भेट दिली आहेच. पण त्यापेक्षा वेगळे महासंगणकाचे निर्माते श्री. विजय भटकर, MKCLचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विवेक सावंत, ज्येष्ठ कलाकार व दिग्दर्शक श्री. अमोल पालेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर, हरियानाच्या शिक्षणमंत्री गिता बुक्कल, सोलापूरचे माजी खासदार श्री. सुभाषबापु देशमुख, स्थानिक आमदार तथा इजिप्त, मलेशिया, सौदी अरेबिया आणि ब्राझिल सारख्या देशातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन माहिती घेतली व मनापासून शुभेच्छा सुद्धा दिल्या.

दोन दशकानंतर मागं वळून बघताना माझे इतर मित्र, त्यांचे व्यवसाय व नोकरी यांच्यातील यश पाहता माझा वेगळेपणा मला आणि माझ्या मित्रांनाही प्रामाणिकपणे भावतो. माझे वेगळेपण अद्यावत आणि जगाबरोबर असल्याचे मला जाणवते आणि आज दोन दशकात जे वैभव, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि ग्राहक धन मिळविले आहे ते माझ्यासाठी लाख मोलाचे आहे आणि त्यात बीजेएसचा वाटा सिंहाचा आहे असे म्हणणे मला आणि माझ्या कुंटुबाला कधीच वावगे वाटणार नाही. आज माझ्या कुटुंबाला सुद्धा माझा सार्थ अभिमान आणि कौतुक सुद्धा वाटते.

सुधीर मुळे यांच्या कार्याला प्रसिद्धी

श्री. सुधीर मुळे हेही लातूरमधील भूकापामुळे बेघर झाले होते. तेही भारतीय जैन संघटनेच्या संकुलात शिकायला होते. त्यांनी कष्टाने शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहिले. त्यांच्यावर सकाळमध्ये भरत पचंगे यांनी लिहिलेला लेख...

img