Testimonial

दयानंद मारुती रोडगे

अन माणूस म्हणून घडण्याचा आमचा प्रवास सुरु झाला

भारतीय जैन संघटना नावाचा नवा सूर्य आम्हा भूकंपग्रस्त मुलांच्या आयुष्यात आला. दिवाळी पंधरा दिवसावर असताना भारतीय जैन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या बस आम्हाला नेण्यासाठी आल्या व आम्ही सर्वजण बसमध्ये बसलो. माणूस म्हणून घडण्याचा आमचा प्रवास सुरु झाला.

अन माणूस म्हणून घडण्याचा आमचा प्रवास सुरु झाला

30 सप्टेंबर 1993 ची महाप्रलंयकारी भूकंपाची ती पहाट माझ्या जीवनात आली आणि माझं अवघे आयुष्य बदलून गेली. मी तेव्हा इ. ८ वीत होतो. नुकतंच शैक्षणिक वर्ष सुरू झालं होतं पण ते भूकंपाच्या झळांनी काळोखल होतं. कसेबसे वर्ग सुरू होते आणि भूकंपाचे लहान मोठे हादरे अधूनमधून डोके वर काढत होते. भीतीच्या सावटाखाली सर्वजण वावरत होते. अशा परिस्थितीत खायची आबाळ असावी अन पंचपक्वानाच ताट अनपेक्षितपणे पुढे यावे तसं घडलं. कोणीतरी बातमी दिली, की भारतीय जैन संघटनेची टीम आपल्या गावात आली आहे व ते मुलांना मोफत खाणे व राहण्याची सोय करून शिक्षणासाठी पुण्याला घेऊन जाणार आहेत.

पुण्याला राहून आलेलं कुटुंब माझ्या शेजारी राहायला आलं होतं. त्यांच्या तोंडून ऐकून ऐकून माझ्या मनात पुण्याविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं. त्या भारावलेल्या अवस्थेतच मी पुण्याला जाण्यासाठी होकार दिला व वडिलांनी माझं नाव दिलं. खेड्यातून शहरात येण्याचा आम्हा सर्व मुलांचा हा पहिलाच अनुभव! आता जे स्वच्छ भारत अभियान चाललं आहे त्याच बीज BJS ने आमच्या जीवनात प्रथम रुजवलं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आम्ही त्यावेळेस गावाकडे उघड्यावर शौचाला जाणारी मंडळी! इथं आल्यावर त्यांनी बंद खोलीतील शौचालयाचा परिचय करून दिला. स्वतः अंघोळ करणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे इ. स्वतःचे काम स्वतः करावे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आदर्श आम्हामध्ये रुजवला. आम्हाला स्वयंपूर्ण बनवले.

आमचे आदरस्थान मा. शांतिलाल मुथ्था त्यांना आम्ही प्रेमाने भाऊ म्हणतो. भाऊ म्हणजे व्यवस्थापन, सामाजिक बांधिलकी, समाज निर्माण व राष्ट्र निर्माण याचा ध्यास घेतलेलं व्यक्तिमत्व. भूकंपग्रस्त, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालक. आम्हा मुलांचा सांभाळ करणं याच व्यवस्थापन भाऊंशिवाय कोणाला जमलं असतं अस वाटत नाही.

आम्हा मुलांची दुसरी जबाबदारी प्रशासन अधिकारी मा. शेळके सर यांची. प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याची. आम्हा मुलांना शिस्त लावणे हे एक लढाईतील यशापेक्षा कमी नव्हते. ते धनुष्यबाण पेलण्याचं काम मा. शेळके सर यांनी केलं. शेळके सर हे प्रत्येक रविवारी आम्हाला नाश्त्यानंतर मार्गदर्शन करायचे. आठवडा भरातील आमचं वागणं यावर ते असायचं. संपूर्ण मार्गदर्शनात एक वाक्य हमखास असायचं 'राक्षसी प्रवृत्ती सोडा'. कोणी चुका केल्या, भांडण केली, चोरी केली , चुकीचं वागलं की हे वाक्य कानी पडायचं. हेच आमच्या वागण्यातील सुधारणांच गमक आहे. आमच्यासह आमच्या गुरुजनांना ज्यांची आदरयुक्त भीती होती असं व्यक्तिमत्व म्हणजे मा. शेळके सर!

मा.अशोक पवार सर...आम्हा सर्व मुलांचे मोठे बंधू. सख्ख्या भावंडांनाही कोणी इतकी माया लावली नसती इतकी माया त्यांनी आम्हाला लावली. निम्म्या रात्री उठायचं आणि कोणाच्या अंगावर पांघरूण नसेल तर त्याच्या अंगावर ते घालायचं. इतकं प्रेम त्यांनी आम्हाला दिल. कोणी काही चूक केली की ती त्यांना लगेच कळायची. आमचे कान पकडून आम्हाला लगेच ताळ्यावर आणायचे. आमच्यासाठी जणू ते कर्मवीर भाऊराव पाटीलच होते.

आमचे सर्व गुरुजन आमचे दैवत. ज्यांनी आमचं बोट धरून आम्हाला मार्ग दाखवला. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझं हस्ताक्षर सुंदर आहे याची जाणीव मला प्रथम करून दिली व शिकण्याची जिद्द निर्माण केली. प्रत्येक लहान लहान गोष्टीच कौतुक केलं त्यामुळे शिकणं आनंददायी झालं. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. पुढे बारावी कला शाखेतून ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो व डी. एडला नंबर लागला. BJS मध्येच राहून बसने प्रवास करून गेनबा सोपानराव मोझे डी. .एड विद्यालय, येरवडा येथून डी. एड पूर्ण केले. खासगी शाळेत ८ वर्षे सेवा केली. सध्या सन २००९ पासून जि. प. प्रा.शाळा, शिरसवडी ता. हवेली जि. पुणे येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. मुले म्हणजे राष्ट्राची भावी पिढी ...या पिढीला सुसंस्कारित व सुशिक्षित करण्याचं व्रत मी स्वीकारले आहे. यासाठी BJS ने दिलेला समाजसेवेचा वारसा पाठीशी आहे.

मु. पो.ता.लोहारा जि. उस्मानाबाद
संपर्क नं. 9922337858
ई-मेल - dayanand.rodage99@gmail.com