Testimonial

भैरवनाथ नामदेव लहोटकर

आय आय टी मुंबई येथे सीनियर ग्रफिक अनिमेशन डिझाईनर


गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य ती मदत

30 सप्टेंबर 1993 साली लातूर-उस्मानाबाद मध्ये भूकंप झाला आणि सर्व काही एका क्षणात होत्याचे नाहीसे झाले त्यावेळी मी इयत्ता 6 वी मध्ये शिकत होतो. आधीच आई -वडील वारल्यामुळे आम्ही चार भावंडे आजोळी राजेगाव येथे मामा आणि आजी आजोबा यांच्याकडे राहत होतो. भूकंपामध्ये माझे दोन भाऊ आणि नातेवाईक म्हणजेच मामा-मामी आणि त्यांची तीन मुले आजी आणि आजोबा असे एकूण आठ व्यक्ती दगावले आणि माझा आधारच नाहीसा झाला. मी खुद्द लातूर येथे वसतिगृहात असल्यामुळे मी या भूकंपातून बचावलो होतो. आणि हे सर्व मला भूकंप होऊन आठ दिवस झाल्यावर गावातील नातेवाईकाने कळवले होते. त्यामुळे मला माझ्या एकाही व्यक्तीचे अंत्यदर्शन घेता आले नाही हे दुःख कायम मनात राहिले.

माझं प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात झाल्यामुळे पुण्यात जैन संघटनेत समरूप होण्यास वेळ लागला. पण या संस्थेतील आदरणीय शांतिलालभाऊ, शिक्षक आणि कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम करून आम्हा विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम केले. मला आजही आठवते दर रविवारी सकाळी श्री शेळकेसर आम्हाला संस्काराच्या गोष्टी तसेच समाजात कसे राहावे, वागावे आणि शिक्षणात प्रगती कशी साधावी हे खूप समजावून सांगायचे पण कदाचित त्यावेळी बालपणात आम्हाला या गोष्टी इतक्या समजत नव्हत्या पण आता त्या व्यवहारिक जीवनात खूप उपयोगी पडतात. मला कला क्षेत्रात प्रचंड आवड होती, एखादे चित्र पाहिले की जसेच्या तसे मी कागदावर उतरवत असे. माझ्या या आवडीमुळे मी चित्रकला या क्षेत्राकडे जास्त आकर्षित झालो. या विषयाचे शिक्षक श्री वाडे, श्री इंगळे आणि श्री नागमुळे सर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले. श्री इंगळे सरांनी मला अभिनव कला महाविद्यालयात ATD साठी प्रवेश घेऊन दिला, पण हे महाविद्यालय जैन संघटना वाघोली येथून फार दूर होते. त्यामुळे मला जैन संघटनेमध्ये राहून कॉलेजला जाणे येणे खूप अडचणीचे होते. तेव्हा श्री अशोक पवार सरांनी माझी निवासाची व्यवस्था विद्यार्थी साहाय्यक समिती, सेनापती बापट रोड, पुणे या ठिकाणी केली. आणि माझ्या महाविद्यालयीन शिक्षणास सुरुवात झाली. विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये कठोर शिस्त, योगा आणि कमवा व शिका या सवयीमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात अजून भर पडली पुण्याची खरी ओळख मला समितीमुळे झाली समितीचे पर्यवेक्षक श्री. रमाकांत तांबोळी सर यांनी कमवा व शिका या योजनेअंतर्गत मला चित्रकला शिकवणी वर्ग मिळवून दिले. याच दरम्यान माझा इतर लोकांशी संपर्क वाढल्यामुळे मला रांगोळी सजावट, लग्न सजावट आणि पेंटिंगची कामे मिळाली. त्यामुळे माझ्या शिक्षणाचा खर्च भरून निघण्यास पूर्ण हातभार लागला. बी. जे. एस.मध्ये १९९३ ते २००० पर्यंत आणि नंतर समितीमध्ये २००० ते २००७ पर्यंत राहून शिक्षण पूर्ण केले आणि कला शिक्षक नोकरीसाठी भटकलो, पण नोकरी काही आजतागायत मिळालेली नाही. याच दरम्यान माझ्या काही मित्रांनी या कला क्षेत्रातील पण संगणकामार्फत करता येणाऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आणि मलाही येथे प्रवेश घ्यायचा होता आणि हा कोर्स फक्त मुंबईला होता. याचा खर्च जवळपास एक लाख होता. माझ्याकडे काही माहितीतील लोकांकडून पैसे गोळा करून मी पुढील शिक्षणासाठी C-DAC अंतर्गत मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट मुंबई येथे प्रवेश घेतला आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. आणि मला IIT मुंबई येथे ग्राफिक डिझायनर म्हणून नोकरी मिळाली.

मागे पाहिलं की आठवतं येथपर्यंत पोहोचताना खूप खडतर प्रवास करावा लागला, वाटेत अनेक संकटे आले पण शिक्षणाची जिद्द कधी सोडली नाही. माझ्या या जडणघडणीमध्ये भारतीय जैन संघटनेतील शिक्षकांचे, मित्रांचे व हितचिंतकांचे खूप सहकार्य लाभले. तसेच जैन संघटना आणि विद्यार्थी सहायक समिती या दोन संस्था या मुळेच मला माझे शिक्षण पूर्ण करता आले. आणि या संस्थांचा आदर्श समोर ठेवून मी माझ्या परीने हुशार, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य आहे ती मदत करत आहे. जसे की माझ्या शेत्रातील मला माहित असलेले सर्व ज्ञान मी विनामूल्य देत आहे. भारतीय जैन संघटनेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली संघटना आहे तिचे वेबसाईटची जबाबदारी मी सांभाळत आहे. आणि प्रत्येक वर्षी गावातील मुलांना दहावी बारावी नंतरच्या शिक्षणातील संधी काय असतात हे सर्व शाळेत जाऊन मार्गदर्शन करीत आहे. मी आणि गावातील शिक्षक मित्र अविनाश देशमुख (माजी विध्यार्थी बीजेएस) शिबिरांचे आयोजन करतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा झाल्याचे आमच्या लक्षात आले आहे. तसेच भूकंपानंतर जी गावे ओस पडली आहेत त्या ठिकाणचा सर्व्हे करून ते आदर्श सामाजिक वनीकरण गाव कसे करता येईल यावर सध्या कार्य चालू आहे. हे समाजाच्या प्रति काहीतरी देणे लागतो म्हणून करण्याचा मानस आहे.